तळवडेचा कडा धबधबा
पर्यटन क्षमता असलेला लक्षवेधक धबधबा.
☔☔☔🌳☔☔☔☔
-: लांजा : —
मुंबई- गोवा महामार्गावरील वेगाने विकसित होणारे ,तळकोकणातील निसर्गरम्य शहर म्हणजे लांजा. गत पाच वर्षात लांजा परिसरात उदयाला आलेल्या खोरनिनको येथील मानवनिर्मित धबधबा व सवतकडा धबधब्यामुळे मोठ्या संख्येने कोकण पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई पुणे येथील पर्यटकांची पाऊले वर्षा सहलीसाठी येथे वळु लागली आहेत. आंबोली सारख्या लोकप्रिय व गर्दिच्या ठिकाणी जाण्यापेक्षा एका नव्या मान्सून डेस्टिनेशनच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांना मात्र त्यामुळे एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.त्यातच सोशल मिडियाने महाराष्ट्रासह गोवा कर्नाटकातील घराघरात पोहचलेल्या या धबधब्यांनी लांजा तालुक्याच्या पर्यटन विकासाला मात्र नक्कीच गती प्राप्त झाली आहे.
लांजा परिसरातील या दोन लोकप्रिय धबधब्यांसोबतच डोंगर उतारांवरुन कोसळणारा, निसर्गाच्या सानिध्यात लपलेला,मनाला भूरळ पाडणारा एक जलप्रपातही आपल्याला चिंब भिजून वर्षासहलीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आमंत्रण देतोय, हा धबधबा म्हणजेच तळवड्याचा कडा धबधबा होय.
लांजा शहरापासून १२ किमी अंतरावर लांजा- कोल्हापूर राज्य महामार्गावर तळवडे गावाकडे जाणारा फाटा लागतो.या फाट्यावरुन डावीकडे आत तळवडे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने एक किमी गेले असता सहाणेचा मांड स्टाॅप लागतो. येथून डावीकडे पाटॊळे परिवाराच्या चॊसुफीकडे जाणाऱ्या रस्त्याने या धबधब्या पर्यंत पोहचता येते. चॊसुफिकडे जाणाऱ्या रस्त्याने आठवण या बंगल्यापर्यंत पक्का डांबरी रस्ता गेल्याने तिथपर्यत चारचाकी वा दुचाकीने जाता येते.पण तेथे मात्र आपण आणलेले वाहन पार्किंग करुन दहा मिनिटे सरळ रानातून पायवाटेची संगत धरली की कड्यावरची ही जलदेवता आपल्याला शुभ्र तुषारकणांनी भिजवित आपले स्वागत करते.
पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान केलेल्या डोंगरातील हा शूभ्र जलधारांनी चिंब भिजविणारा “कडा धबधबा ” पर्जन्यप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.झुळुझुळु वाहणारा ओढा,निरव शांतता, आरोग्यदायक व उत्साहवर्धक वातावरण, स्वच्छंदीपणे विहरणारे विविधांगी पक्षी, चिंब भिजण्यासाठी सुरक्षित असलेला यामुळे तळवडे गावातील या धबधब्यावर येणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. धबधब्याच्या अदमासे ४५ ते ५० फुटावरुन कोसळणा-या जलप्रपाताने धबधब्याखाली ४ ते ५ फुटाचा वर्तुळाकृती डोह ( घळ) तयार झाली असून तीची खोली जवळपास ०७ ते ०८ फूटापर्यंत असल्याने पर्यटकांनी पोहता येत नसेल तर डोहाच्या बाजूनेच आनंद घेतलेला सुरक्षिततेच्या दृष्टिने उत्तम ठरेल. लांजा शहरापासून १३ ते १४ किमी अंतरावर असलेल्या या धबधब्यापासून हाकेच्या अंतरापर्यन्त डांबरी रस्ता असल्याने जास्त पायपीट करावी लागत नाही.खाजगी वाहन किंवा रिक्षाने येथे सहज पोहचता येते.येथे जर बसने यायचे असेल तर तळवडे गावातील सहाणेचा मांड या स्टाॅपवर उतरून चॊसूफी रस्त्याने १५ ते २० मिनिटे पायी चालत आपण येथे पोहचू शकतो. जवळपास दुकान वा हाॅटेलची व्यवस्था नसल्याने धबधब्यापासुन २ किमी अंतरावर तळवडे फाटे येतये असलेल्या स्नेह हाॅटेल येथे नाश्त्यासह भोजनाची व्यवस्था होऊ शकते.अगाऊ संपर्क साधल्यास गैरसोय टाळता येईल.पर्यटकांना साद घालणा-या या धबधबा सोबतच निसर्गरम्य तळवडे गावातील अन्य ठिकाणांच्या विकासासाठी तळवडे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्यास पावसाळी पर्यटनासाठी लांजा तालुक्यातील तळवडे गाव केंद्रबिंदू ठरेल.
श्री विजय अरविंद हटकर.
मुक्त पत्रकार । ब्लाॅगर
तळवडे, ता.लांजा