लांजा तालुक्याच्या पश्चिम दिशेला अवघ्या आठ किलोमीटर वर निसर्गाच्या वरदहस्ताने बहरलेले आणि सर्व बाजूनी डोंगराच्या कुशीत ८५ घरट्यांचे वसलेले
गाव माझे निओशी. वर्षभर हिरव्या रंगाची झालर पांघरून असलेले छोटेखानी पण टुमदार गाव….ग्राम दैवत श्री ठाणेश्वरच्या कृपा आशीर्वादाने गावात सुख-शांती नांदते. गर्द वनराई मध्ये श्री ठाणेश्वराचे मंदिर,बाजूला गावाची तहान भागवण्यासाठी वाहणारा झरा,निरव शांतता, मध्येच पक्षांचे त्यांच्या भाषेत सुरू असणारे बोलणे, वाऱ्याच्या गतीने झाडांच्या पानांची आणि फांद्यांमधून हलकासा निघणारा नाद वातावरण खूप प्रसन्न करून सोडते. ग्रामदेवतेच्या मंदिराशिवाय गावात, श्री.विठलादेवी,गणपती मंदिर,श्री. जांगलदेव आणि महापुरुष यांची आकर्षक मंदिरे आहेत. गावाच्या चतु:सीमेत प्रवेश केला की पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. गावाच्या चारी दिशेने बाहेरच्या गावातून येणारा वाटसरू हेच पाणी पिऊन आपली तृष्णा भागवतो.गावाच्या वरच्या बाजुने वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी ग्रव्हीटीने गावच्या मध्यावर दोन
साठवणूक टाक्या बांधून त्यात साठवून त्या माध्यमातून गावाला पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्याच प्रमाणे काही वर्षांपुर्वी बांधण्यात आलेल्या इंदवटी
धरणाच्या जलाशयाचा बराचसा भाग हा निओशी गावाच्या हद्दीत येतो आणि भविष्यात हेच धरण एक पर्यटन स्थळ म्हणून नक्कीच सर्वांच्या मनात घर करणार यात अतिशयोक्ती नाही.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार झालेल्या रस्त्यांमुळे गावाचे आणि लांजा शहराचे नाते जवळचे झाले आहे.
गावातील बरेचसे तरुण आपल्या अर्थाजनासाठी जरी मुंबई सारख्या शहरात असले तरी त्यांची आपल्या गावाशी चांगली अशी नाळ जुळलेली आहे.गणेशोत्सव, शिमगा आणि मे महिन्यात मुंबईतील हा वर्ग आपल्या मातृभूमीत येत असतो.गावात भात शेतीतुन किमान आपल्या कुटुंबा पुरते वर्षभर पुरेल एवढे धान्य कसले जाते.भात शेती सोबतच पालेभाज्यांची शेती ही केली जाते.काही तरुण वर्ग जरी मुंबईत नोकरी निमित्ताने असला तरी गावात असलेले तरुण ही विविध प्रकारच्या कला अंगिकारून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.मग कोणी सुतार काम,रंगकाम,रिक्षा व्यवसाय, किराणा दुकान,दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन इ.माध्यमातून आपला व्यवसाय करत आहेत. काहींनी आधुनिक शेतीमध्ये चांगल्या प्रकारे जम बसविला आहे.
भारतीय संस्कृती ही विवध सणांनी नटलेली आहे. गावात त्रिपुरी पौर्णिमा, श्री जांगलदेव यात्रा, शिमगा उत्सव, आणि सर्व जण ज्या सणाची वर्षभर वाट पाहत असतात
तो गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.गावात हिंदू कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असला तरी मराठा समाज ही आहे. कुणबी समाज आणि मराठा समाज हे गुण्या गोविंदाने गावात नांदतात.गावात आंबा, काजू,नारळी, फोपळी च्या बागा आहेत, त्यात लांजा बाजारपेठत काही मोजक्या गावातून काजू बिया विक्रीला जातात त्यात आमच्या गावाचा नंबर पहिल्या दहा गावांमध्ये आहे.
लहान मुलांवर योग्य प्रकारे शैक्षणिक संस्कार व्हावेत यासाठी गावात अंगणवाडी आहे.जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा गावच्या प्रवेशद्वारापाशी शांत ठिकाणी आहे. आपल्या गावातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाट वाटचालीवर गावातील तरुणांचे संकल्प ग्राम विकास प्रतिष्ठाण च्या माध्यमातून काळजीपूर्वक लक्ष आहे.पाचवी नंतर पुढील शिक्षणासाठी कोंडये, इंदवटी,खावडी आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी लांजा येथे जावे लागते.
गावाला सांस्कृतिक कलेचा वारसा खूप वर्षांपासून लाभलेला आहे.श्री ठाणेश्वर नमन मंडळ वरचिवाडी हे आपली नमन कला खूप वर्षांपासून जपत आले आहेत.कोकणची अजून एक समृध्द लोक कला म्हणजे शक्ती तुरा.शक्तीवाले श्री.सत्यम गणेश मंडळ तांबेवाडीने जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मारण्या
पर्यंत मारली आहे.त्याच प्रमाणे श्री ठाणेश्वर युवा मंडळ- तुरेवाले, श्री ठाणेश्वर नाच मंडळ वरची वाडी- तुरेवाले, नवतरुण विकास मंडळ तांबेवाडी-शक्तीवाले ही मंडळे ही आपली ही कला तळ हाताच्या फोडाप्रणाने जपत आले आहेत
आपली ही कला तळ हाताच्या फोडाप्रणाने जपत आले आहेत.
पूर्वी गावात ऋतू नुसार खेळ खेळले जायचे.विविध क्रीडा प्रकारात गावातील मुलांनी आपल्या खेळाचा ठसा उमटविला आहे. खो- खो ,कबड्डी, अथलेटिक्स प्रकारात गावातील मुलांनी आपल्या शालेय जीवनात तालुका,जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये गावातील संघाकडे तालुक्यातील नावाजलेला संघ म्हणून पाहिले जाते.
असा हा विविधरंगाने आणि ढंगाने सजलेला माझा गाव विकासाच्या प्रतीक्षेत जरी असला तरी जे आहे ते गोड मानून घेणारा आहे. ग्राम विकास कमिटी च्या माध्यमातून गावात टप्प्याटप्प्याने विकास कामे सुरू आहेत. गावची लोकसंख्या ५०० ते ६०० आहे. आवश्यक मतदार संख्या नसल्याने गावची स्वतंत्र ग्राम पंचायत नसून ग्रुप ग्राम पंचायत इंदवटी-निओशी अंतर्गत समावेश होतो.