Mpvs-सरिता विकासाची…
‘मुचकुंदी परिसर विकास संघ- लांजा,राजापूर’ या सामाजिक क्रियाशील संघटनेची वाटचाल सामाजिक हिताचा विचार करता नजरेत भरणारी तर आहेच परंतु समाजमनावर त्याचा उत्तम परिणाम देखील निदर्शनास येत आहे. आणि याच सर्व विकासात्मक गोष्टींचा मागोवा घेताना मला ही या प्रामाणिक चळवळीत सहभागी व्हायची इच्छा झाली.
आजवर नाटकाच्या निमित्ताने अन अशाच काही आवडीने अनेक संस्थांच्या कार्यक्रमात जाणे येणे असताना आपल्या तालुक्यात ही तालुक्यातील होतकरू कर्तृत्वांसाठी स्वतःचे असे संस्थात्मक व्यासपीठ असावे असे वाटत होते. या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढे जाऊन नाव मिळणारे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत पहाताना आपल्याकडील टॅलेंट अशाच व्यासपीठाअभावी पुढे येत नाही याची खंत मनाला टोचत होती. परंतु mpvs या संस्थेची कार्यपद्धती अन त्याचा समाजमनावरील प्रभाव पहाताना मनाला खात्री झाली की अशाच तर संस्थेचा शोध होता आपल्याला.
राजापूर लांजा तालुक्यांची तसं पहाता संस्कृती अगदी एकच, विकासधारा ही त्यामानाने मंदावलेली, आरोग्यसुविधांचा तर पूर्णतः बोजवारा उडालेला. ग्रामीण रुग्णालयांची दुरवस्था झालेली. जेव्हा तातडीने गरज भासते त्यावेळी फक्त तोंड उघडणारे सुज्ञ, सुशिक्षित आम्ही इतरवेळी दुर्लक्षच करतो. लोकप्रतिनिधींकडे बोट दाखवताना सुजाण नागरिक म्हणून आपण सुद्धा या जीवनावश्यक दुरावस्थेला खरे कारणीभूत आहोत. हे सगळं कळतं पण वळत नाही अशी अवस्था आहे. परंतु आज mpvs मुळे सामाजिक बदलांविषयी तळमळ असणारा तरुण वर्ग एकत्र आला आहे. प्रामाणिक विचारांनी समर्थ झाला आहे. आणि हीच एकतेची वज्रमुठ विकास वाटेतील अडथळ्यांचा सामना करायला सज्ज झालेली आहे. खरंच खूप कौतुकास्पद ती व्यक्ती जिथून हा विचार उगम पावला. अन आभिमानस्पद त्या व्यक्ती ज्यांनी हा प्रगतीचा विचार उचलून धरला.
आज दोन अडीच वर्ष उत्तम आरोग्यव्यवस्थेसाठी झटणारी ही संघटना इतर क्षेत्रात ही तितक्याच तळमळीने कार्य करताना या मातीतील कला कौशल्यांना स्वतःचे असे व्यासपीठ निर्माण करून देत आहे. आज पर्यंत इथला कलाकार आपल्या पारंपरिक कला जपताना त्या अंगणाच्या बाहेर घेऊन जायला तितकासा यशस्वी होत नव्हता. परंतु mpvs ने इथे ही काम करताना पारंपारिक कलांबरोबर दडलेले कलागुण लोकांसमोर मांडण्यासाठी youtube चॅनेल वरून जागा दिली. विचार लेखांना व्यासपीठ दिले. एकंदर सीमित असणाऱ्या कलाक्षेत्राला जणू अमर्याद नभांगण दिले. आपली माणसं जेव्हा आपल्या माणसांच्या पाठीशी उभी राहतात, चांगल्या गुणांचे कौतुक करतात त्यावेळी जगाच्या स्पर्धेत उतरण्याचे बळ वाढलेले असते. हेच पाठीवर थाप देण्याचे कार्य mpvs करत आहे. खरोखरच कलाक्षेत्रासाठी पुढे आशादायी पाहुल आहे.
तरुण ही विकसनशील समाजाची खरी ताकत असते. तरुणाईला योग्य विचारधारेच्या रस्त्याने वळविले, योग्य ते संस्कार योग्य त्या वयात दिले तर पुढे जाऊन समाज आर्थिक श्रीमंती बरोबरच उत्तम विचारांच्या संपत्तीने ही श्रीमंत होईल. या प्रकियेतील प्रत्येक पाहुलांची ओळख mpvs च्या प्रत्येक उपक्रमात जाणवते. अगदी सरळ साधी जीवनपद्धती जगणारा माणूस ही या प्रवाहात सामावून जाताना उत्तम समाजमुल्यांच्या देवाणघेवाणीत कळत नकळत कार्यशील होतो. या संस्थेची नेतृत्व शक्तीच समृद्ध विचारांनी प्रभावित अन तितकीच कृतिशील असल्याने भविष्याचे स्वप्नांकीत चित्र लवकरच प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल याची मनोमन खात्री वाटते.
आज कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत आरोग्य विभागाकडे नेहमीच आजपर्यंतच्या सरकारचे होणारे दुर्लक्ष किती धोकादायक आहे याची जाणीव मनाला होते. छोट्या छोट्या आजारांनाच अपूर्ण असणाऱ्या आरोग्यव्यवस्था आज कोरोनाच्या महामारीत पूर्णतः कोलमडून जाण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळे वेळीच या महत्वपुर्ण गरजेकडे लक्ष वेधने गरजेचे आहे. अन याची जाणीव mpvs ला या आधीच होऊन त्यासाठी प्रयत्न देखील चालू करून दोन पाहुलं पुढे चालण्याची तयारी या संस्थेच्या कार्यपद्धतीत अन समर्थ नेतृत्वात दिसते.
आज विकास, प्रगती अन स्पर्धात्मक जगाचा विचार करता अशा उत्तम विचारांनी समृद्ध अन कृतिशील संघटनेची खरोखरच लांजा-राजापूर या दोन्ही तालुक्यांना गरज होती. आणि mpvs संस्था या साठी परिपुर्ण उत्तर आहे. त्यामुळे प्रत्येकाने या चळवळीत सहभागी होऊन योग्य ती भूमिका निभावून प्रामाणिक, निस्वार्थ कार्य करावे. मिळणारे फळ हे निश्चितच गोड असेल.
धन्यवाद
✍🏻 राजन सुर्वे
रुण, ता. लांजा