🌊🌊🌊🌊 🌊
निसर्गरम्य आणि सुरक्षित
“वेरळचा कडा धबधबा”
महाराष्ट्रात वेरळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर औरंगाबादेतील अजोड अद्भुत लेणी समूहाने प्रसिद्ध असलेले वेरूळ गाव उभे राहते.परंतु याच नावाशी साधर्म्य असणारे एक गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. सन २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली स्मार्ट ग्रामपंचायत हा बहुमान पटकावून चर्चेत आलेले वेरळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तेथील मनमोहक कडा धबधब्याने।
परमेश्र्वराने भरभरुन दिलेल्या कोकणातील प्रत्येक गावच निसर्गसमृद्ध आहे.पावसाळ्यात तर त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून येते. मुंबई गोवा महामार्गावर वसलेले टुमदार असे वेरळ गाव असेच एक सुंदर निसर्गरम्य गाव. पावसाळ्यात नेहमीच्याच धबधब्यांवर वर्षा सहलींचे आयोजन करुन अथवा चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद घेऊन नव्या व हटके धबधब्याचा शोध घेणा-या भटक्यांसाठी अर्थात पर्यटकांसाठी वेरळचा कडा धबधबा हा उत्तम पर्याय आहे.आजपर्यंत मानवी कोलाहलापासून दूर असलेला हा शूभ्र फेसाळणारा जलप्रपात आपल्या स्वागतासाठी आसुसला आहे.