श्री. राजन सुर्वे
गाव : रुण, तालुका : लांजा
तुझे असून तुजपाशी….
कोकण म्हणजे चाकरमन्यांच्या मानिऑर्डर वर आर्थिक बाजू अवलंबून असलेला प्रदेश. अशीच आजपर्यंत कोकणची ओळख आहे. त्याला कारणे ही तशीच.. उठसूट थोडंफार शिक्षण गावात करून मुंबईला जाणे अन मिळेल त्या नोकरीत समाधान मानणे एवढीच अल्पसंतुष्ट मानसिकता. आजूबाजूची गगनाला गवसणी घालणारी कोकणातील उदाहरणे काय कमी नाहीत, परंतु परस्पर द्वेषी खेकडा वृत्तीला निष्ठेने चिपकलेले पारंपरिक संस्कार, कोष भेदायच्या मनापासून तयारीत नाही. त्यामुळे स्वर्गस्वरूप कोकण,तितकेच उच्च टॅलेंट असताना किंबहुना जे स्वयंपूर्णतेला आवश्यक ते सगळं काही उपजत असताना ही अल्पसंतुष्टीने पायात बेडी अडकवलेली त्यामुळे अजून ही अनेक गोष्टीत मागे आहे.
‘तरुण’ ही समाज,संस्कृती, शिक्षण, विकास प्रगती उन्नतीची शक्ती म्हटलं तरी, कोकणातील ही सुज्ञानी शक्ती मुंबईतील 10×10 च्या खोलीत तेवढ्याच स्वप्नानिशी नोकरदार मानसिकतेत स्वतःला ऍडजस्ट करत आली, करत आहे. त्यामुळे स्वयंपूर्णतेच्या बाबतीत कोकण गतीहीन झालेले आहे.
लांजा-राजापूर या अल्पसंतुष्टीच्या स्पर्धेत कुठे ही मागे नाही. आज या तालुक्यातील बहुसंख्य तरुण मुंबईच्या धावपळीत धावत आहे. यातील अनेकजण पिढीजात 10×10 चं साम्राज्य ठिगळ लावत उपभोगत आहेत. अनेक परकीय मुंबईत येऊन फुटपाथ वरून अगदी गगनाला भिडणाऱ्या गगनचुंबी टॉवरपर्यंत मजल मारत गेले, पण आम्ही इथले उपरे होऊन मुंबईच्या ही बाहेर फेकले जात आहोत. आणि तरीही आम्ही ढिम्म. कळतंय पण वळत नाही अशी मनःस्थिती. कोण पुढे जातच असेल तर टिंगल टवाळी. आमच्या टॅलेंटने, कर्तृत्वाने आम्ही बाहेरच्याला पुढे घेऊन जाऊ, पण स्वतः मात्र पारंपरिक चौकट सोडायला तयार नाही. याच आपल्या उदासीन मानसिकतेचा फायदा बाहेरील माणसं मात्र जोशात उठवत आहेत. त्यामुळेच आज लांजा-राजापूरच्या बाजारपेठेत बाहेरील टक्का आणि आपले व्यावसायिक सोडून बाहेरच्यांकडेच खरेदी करणारा आपल्या माणसांचा टक्का हा जास्त आहे. आम्ही मालक असून नेहमी गिऱ्हाईक बनत आहोत अन आमचंच अस्तित्व मिठवत आहोत. निसर्गाने कोकणाला समृद्ध केले परंतु आम्ही आमच्या खेकडा वृत्तीचे दफन करायला तयार नाही त्यामुळे आम्ही स्वयंपूर्ण होत नाही. ही सगळी उजळणी आहे, नेहमीचंच कथाकथन आहे. परंतु आता नव्याने आपली ताकद ओळखून स्वयंपूर्णतेच्या स्वराज्याची शपथ घेणे काळाची गरज नव्हे तर आपल्या प्रत्येकाची अत्यावश्यक निकड आहे.
आंबा,काजू मध्येच गुरफटलेले आम्ही त्यातील नावीन्य, तंत्रज्ञान, व्यावसायिक गणिते या पासून अजून थोडे दूरच आहोत. त्यामुळे या व्यवसायात दरवर्षीच नाराजी असते. इथे नव्या सुज्ञानी पिढीने व्यावसायिक दृष्टीकोनांतून नवनव्या संकल्पनेआधारे पुढे येणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त आपल्याकडे अर्थार्जनासाठी खूप काही आहे. पण सारं दुर्लक्षित. कोकम,फणस,करवंद,नारळ,भाजीपाला, काय होत नाही या तांबड्या मातीत, सगळं काही होतं. अपवादात्मक उदाहरणे देखील आहेत. परंतु आम्हाला ती माहिती घेणे गरजेचे वाटत नाही. जमीन विकून बाईक घेऊन शहरात भरकटत असणारा आमचा तरुण अशा अर्थाच्या गोष्टीत अर्थ शोधत नाही. ही खरी खंत आहे.
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजीराजे यांना कोकणाची महती कळली होती. परंतु त्या अभिमानी इतिहासाचे आजचे आम्ही सुशिक्षित वारसदार असून ही आम्ही व्यर्थात अर्थाचा शोध घेत फिरतो आहे. राजापूर बंदर त्या काळी व्यापारासाठी प्रसिद्ध होते. इथले मसाले त्यावेळी बाहेर जायचे. परंतु आज मसाल्यांच्या पिकातील पैसे आम्हाला दिसत नाहीत. किंबहुना आम्ही तो प्रयत्न करत नाही. कोकणातील खाद्यसंस्कृतीची अवीट चव चाखायला खवय्ये कितीही पैसे मोजायला तयार आहेत, परंतु त्यातील उद्योग व्यवसाय करायला आम्ही पुढे येत नाहीत. पैसा इथल्या मातीतच आहे. फक्त मातीत मन मिसळून मोती वेचायला आम्ही कमी पडतो आहोत. आणि ही मातीच जीचं खरं महत्व बाहेरच्यांना कळलंय त्यांना काही पैशात विकून आम्ही आमचं नामोनिशाण मिठवायला पुढे सरसावलेलो आहोत.
एका कृषी संस्थेतून काम करताना या दोन्ही तालुक्यातील लोकांना जवळून वाचताना लक्षात आलं की लोकांनी आता हळूहळू परिवर्तनाला सुरवात केलेली आहे. मातीतले उदयोग व्यवसाय अंगिकरायला प्रारंभ केलेला आहे. फक्त त्याचे व्याकस्थित मार्केटिंग आणि आत्मविश्वास,संयम गरजेचा आहे. आज बचतगटाच्या माध्यमातून इथली रणरागिणी अर्थार्जनाच्या मैदानात आपल्या हाताच्या अवीट चविनिशी उतरलेली आहे. फक्त ती स्थिरस्थावर होण्यासाठी थोडी बाहेरच्यांची मानसिकता शिकणे आवश्यक आहे. समाजाने ही आपल्या लोकांना पाठबळ देणे,सहकार जो कधी कोकणात रुजलाच नाही तो रुजविणे गरजेचे आहे. इथल्या तरुणाने उच्च शिक्षण घेतानाच जी आपली खरी ताकद शेती आहे त्यात इथल्या विद्यापीठांचा वापर करून घेत नव्या दृष्टीने स्वतःला आजमवून पहाण्याची हीच वेळ आहे. इथली तालुक्यांची शहरे तिथे आपले व्यवसाय जास्त कसे होतील, त्यासाठी योग्य ती अभ्यासपूर्ण तयारी करणे अन कृतिशील होणे महत्त्वाचे आहे. मुळात इथल्या सुवर्णमय मातीत घट्ट पाय रोवून वरील अमर्याद संधींचे खुले आभाळ दृष्टीपथात ठेवले तर आर्थिक श्रीमंती दूर कुठे शोधण्याची अजिबात गरज नाही. ‘तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी’ या उक्तीप्रमाणे ती जागा नव्या बदलत्या जगाच्या दृष्टीकोणाने शोधली ना तर कधीच कशाची कमी पडणार नाही.
मुळात सगळं काही उपलब्ध असताना जे प्रश्न परंपरेने आम्हीच तयार करत आलो आहोत त्यांची उत्तरे या मातीत रहाऊन आमची आम्हीच शोधली तर स्वयंपूर्णता आमच्यासाठी दूर नाही. गरज आहे आम्ही एकत्र येऊन परस्परांना सहकार्याचा हात देण्याची, अभेद्य साखळी निर्माण करत प्रगतीचे, विकासाचे गड सर करण्याची. त्यासाठी ‘मुचकुंदी परिसर विकास संघ’ या संस्थेने सर्वांना एकत्र आणत स्वतःला ओळखत, स्वतःच्या कला कौशल्याचा विकास करतानाच मिळून पुढे जाण्यासाठी जो मार्ग आखला आहे, जे प्रयत्न चालले आहेत ते खरोखरच कौतुकास्पद! या प्रवाहात आपण आलो पाहिजे. या संस्थेच्या माध्यमातून उदासीन राजकीय, प्रशासकीय शक्तींचे लक्ष इकडे वळवूया.
चला तर मग एकत्र येऊ. स्वयंपूर्णतेच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणूया.
धन्यवाद!
✍🏻 राजन सुर्वे