मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापूर) ही फक्त संघटना नसून ही एक चळवळ आहे, हा एक लढा आहे, आपल्या माणसांनी आपल्या विकासासाठी उभारलेला. विद्यमान अध्यक्ष श्री. विजयदादा भगते यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली एक चळवळ आपल्या सर्वांच्या सहभागामुळे आणि पाठिंब्यामुळेच यशस्वीरित्या तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे.
ही संघटना राजकारण विरहीत असून जात पात, धर्म, पंथ आणि इतर भेद यांना मानत नाही. संघात विविध गावातील प्रतिष्ठित, सुशिक्षित व्यक्ती, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आदी मंडळी कार्यरत आहेत आणि काहीही करुन आपण आपल्या परिसरात विकासाची गंगा वाहावी म्हणून जिवाचे रान करण्यास तत्पर आहेत. हे या संघटनेचे वैशिष्ट्य आहे.
मुचकुंदी नदीवर वडदहसोळ आणि गोळवशीच्या मध्ये पूल व्हावा आणि शाळेतील मुलांचा त्यांच्या पालकांचा, लोकांचा चालू असलेला जीवघेणा प्रवास कायमचा थांबावा म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या पाठपुरावा टिमच्या अथक मेहनतीने आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पुलाला सर्व मान्यता मिळाल्या असून आपले स्वप्न हे स्वप्न राहिले नसून ते प्रत्यक्षात अवतरणार आहे, हे सांगत असताना आमचा उर अभिमानाने भरून येत आहे. हे करत असताना ज्या सर्वांचे आम्हाला सहकार्य आणि सहभाग लाभला, त्या सर्वांचे जाहीर आभार आम्ही मानतो.
या संघटनेच्या माध्यमातून फक्त पुलासंबंधित मर्यादित न राहता संपूर्ण लांजा राजापूरमधील जनतेच्या सेवेप्रित्यर्थ ओणी येथे विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर, लांजा येथे आरोग्य शिबीर, मुंबई आणि गावी मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा, वर्षा सहल असे विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत.
लांजा, राजापूर आणि ओणी येथील तिन्ही आरोग्य केंद्रांची सद्य दुरावस्था आम्ही जाणून त्या परिपूर्णरित्या चालू करण्यासाठी तन मन धन लावून काम करत आहोत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात लांजा येथे आपल्या हजारो माणसांच्या साक्षीने आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थित आपल्या आरोग्य सुविधा सुधारण्याच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला. सामान्यातील सामान्य माणसाला असामान्य आरोग्य सुविधा सोईस्करपणे उपलब्ध व्हाव्यात म्हणून आमचा लढा चालू होता, आहे आणि राहणार. आम्ही तो पर्यंत गप्प बसणार नाहीत जो पर्यंत आमचे प्रश्न हे सोडवले जाणार नाहीत, हे वचन मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर आपल्याला देत आहे.
मुंबईसारख्या शहरात आरोग्यविषयक होणारा त्रास कमी करण्यासाठी निवडक आणि महत्वाच्या हॉस्पिटलमध्ये आमची टिम आपल्या सेवेत रुजू करण्यात आलेली आहे.
आपल्या लोकांना कुठेतरी आर्थिक हातभार मिळावा म्हणून सभासद कल्याण निधी फंड ही संकल्पना राबवत आहोत. आणि रोजगाराचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आणि आपल्या लोकांना उद्योजक बनवण्यासाठी, बनवलेल्या मालाचा दर्जा उंचवण्यासाठी आणि तो विकला जाण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत. म्हणून आपण सर्वांनी आमच्या या लढ्याचा, चळवळीचा भाग व्हावे, आम्हाला सहकार्य करावे, हे जाहीर आवाहन आपणांस करत आहोत.