समृद्ध निसर्गाचा अविष्कार
वेरवलीचा धबधबा
🏝️🍃🌊🌊🌊🌊🍃🏝️
वेरवली हे मध्य कोकणातील विहंगम तालुका म्हणून ख्याती असलेल्या लांजा तालुक्यातील महत्वाचे गाव. चारही बाजुंनी डोगरद-यांनी वेढलेले निसर्गसमृद्ध वेरवली बुद्रुक हे गाव बेर्डेवाडी धरणावरील मानवनिर्मित धबधब्याने कोकणच्या पर्यटन नकाशावर चर्चेत आले आहे.या बैठ्या धबधब्याने पर्यटकांवर मोहिनी घातली असून या धबधब्याचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही.
मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातून जाणाऱ्या लांजा – कोर्ले रस्त्यालगत दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रिच्या कुशीत वेरवली बुद्रुक हे गाव वसलेले आहे.लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाचे व मोठ्या लोकसंख्येचे हे गाव अलीकडेच कोकण रेल्वेचे स्थानक झाल्याने रेल्वेच्या नकाशावर आले.या गावात आकारास आलेल्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाने सिंचन, शेती व पर्यटनाला चालना मिळाली आहे.धरणाच्या भिंतीमधुन पाण्याचा विसर्ग होण्यासाठी कालव्या सारखा मार्ग तयार करण्यात आला असून यातुन २५ फुटावरुन कोसळणारा मानवनिर्मित धबधबा पाहून मन प्रफुल्लित होते.
लांजा शहरातुन अर्ध्या तासात वेरवली धबधब्यावर पोहचता येते.वेरवली गावात प्रवेश केल्यानंतर राम मंदिर स्टाॅप लागतो. या स्टाॅपजवळच असणारा कोकण रेल्वेचा बोगदा आपले स्वागत करतो. हा बोगदा पार केल्यानंतर लगेचच डाव्या हाताला वळलेला रस्त्याने साधारण एक कि.मी.गेल्यावर वेरवलीच्या धबधब्यापाशी पोहचता येते. भोवतालचा हिरवागार परिसर व समोरच्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पावर असलेल्या मानवनिर्मित धबधब्याचा पांढ-या शुभ्र जलधारा डोळ्यांचे पारणे फेडतात.धबधबा ह्या शब्दातच केवढा फोर्स आहे हे येथे आल्यावर मनोमन पडते. हा धबधबा बैठा स्वरूपाचा असून उंची २५ फुट असली तरी वेगाने कोसळणाऱ्या जलधारांनी धबधब्याखाली डोह तयार केला आहे.हा डोह उथळ नसल्याने थेट धारेखाली भिजताना काळजी घ्यावी.डोहाच्या पुढे काही अंतरावरील भागात मात्र चिंब भिजण्याचा ,एकमेकांवर जलतुषार उडवण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. हा धबधबा लांजा शहरापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मोठ्या संख्येने लोक येथे वर्षा सहलीसाठी येत आहेत.भर उन्हाळ्यातही हा धबधबा प्रवाहित असल्याने जुन व जुलै हे मुसळधार पावसाचे पहिले दोन महिने सोडून ऑगस्ट ते मे दरम्यानचा काळ येथे येण्यासाठी उत्तम ठरतो.वेगवेगळ्या ऋतुत निसर्गशिल्पाचे विविधांगी रुप न्याहळण्यासाठी येथे जरुर आले पाहिजे.